पुणे तिथे काय उणे, उमेदवाराची ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ स्टाईल, नुसती चिल्लरच चिल्लर
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Pimpri Chinchwad by Election) अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला.
पुणे : पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Pimpri Chinchwad by election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. कसबा पेठ मतदारसंघात काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी झाल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी होत असल्याचं चित्र आहे. या सगळ्या घाडमोडींदरम्यान दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये एक वेगळाच प्रकार बघायला मिळाला. अर्ज दाखल करायला आलेल्या एका अपक्ष उमेदवार डिपॉझिट जमा करण्यासाठी थेट दहा हजारांची चिल्लर घेऊन आलेला बघायला मिळाला. त्यामुळे अधिकाऱ्यांना चिल्लर मोजायला बराच वेळ लागला.
पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या पोटनिवडणुकीत सहभाग घेण्यासाठी अपक्ष उमेदवार राजू बबन काळे यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला.
विशेष म्हणजे राजू बबन काळे यांनी अर्ज भरताना डिपॉझिटसाठी आणलेली रक्कम चिल्लरच्या स्वरुपात आणल्याने अधिकाऱ्यांना ती मोजण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली.अखेर काही काळ सर्वच अधिकारी चिल्लर मोजत बसले आणि मोजणी पूर्ण झाली.
मराठी चित्रपटातही असाच एक प्रकार
असाच एक प्रकार ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटातही आपण पाहिला आहे. या चित्रपटातील नायक हा निवडणुकीसाठी अर्ज भरायला जातो तेव्हा सोबत चिल्लर घेऊन जातो. त्यामागील कारण म्हणजे इतर उमेदवारांना अर्ज भरायला वेळ मिळू नये.
अर्ज भरणारे सरकारी कर्मचाऱ्यांचा पूर्ण वेळ चिल्लर मोजण्यातच जातात. त्यामुळे इतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यास वेळ शिल्लक राहत नाही. असाच काहीसा प्रकार चिंचवडमध्ये बघायला मिळाला.
अर्थात चिंचवडमधील प्रकारामागे दुसरं काही कारण असू शकतं. पण या प्रकरणाची चौकशी आता सर्वत्र सुरु झालीय.
पिंपरी चिंचडवडमध्ये कुणाकुणाला उमेदवारी?
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आलीय.
विशेष म्हणजे चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराबद्दल प्रचंड सस्पेन्स बघायला मिळाला. सुरवातीला राहुल कलाटे यांना उमेदवारी जाहीर होईल अशी शक्यता होती. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड घडामोडी घडल्या.
पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्यानंतरही राष्ट्रवादीकडून काल उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. अखेर शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करण्यात आला.