पंकजा मुंडे यांचं मराठा आरक्षणावर असं विधान की ज्यामुळे… राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार?; पुढे काय?
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमेचीही माहिती दिली. शिवशक्ती परिक्रमा यात्रेला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळे प्रश्न आहेत. सध्या राज्यावर दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे.
सोलापूर | 8 सप्टेंबर 2023 : भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमा यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचं गावोगावी जंगी स्वागत केलं जात आहे. त्यांच्यावर फुलांची उधळण होत आहे. शक्तीपीठांना त्या भेटी देत असून लोकांची विचारपूसही करत आहेत. यावेळी त्यांच्याकडे नागरिकांकडून गाऱ्हाणी मांडण्यात येत आहेत. मराठा आंदोलकांनीही पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे. तसेच पंकजा मुंडे या आपल्या यात्रेच्या माध्यमातून राजकीय विधानेही करत आहेत. त्यातील अनेक विधाने ही राज्य सरकारला अडचण करणारी आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज त्या सोलापुरात होत्या. यावेळी त्यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे, त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जोर धरत आहे. राज्य सरकारनेही त्यादृष्टीने पावलं उचलली आहेत. त्यावर पंकजा मुंडे यांनी आपली स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. ओबीसीतून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची फक्त आरक्षण देण्याची मागणी होती. मराठा समाजातील वंचित समाजाला आरक्षण देण्यास सर्वांची मान्यता होती. आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाला समर्थन आहे. पण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं संवैधानिक दृष्ट्या योग्य नाही. त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं योग्य नाही. ठरावीक वर्गाला ते देऊ शकतात. त्यांना स्वच्छ आणि खरखरं आरक्षण द्यायला हवं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
जीआर पाहिला नाही
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर काढण्यात आल्याचंही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. त्यावर, जीआर खरंच काढला का? मी परिक्रमेत आहेत. मी जीआर पाहिला नाही. त्यामुळे मला त्याबाबत अधिक माहीत नाही, असं पंकजा म्हणाल्या.
लेकरांनो, हातजोडते…
यावेळी आत्महत्या करू नये म्हणून पंकजा मुंडे यांनी मराठा तरुणांना हातजोडले. हातजोडून विनंती करते. सर्व लेकरांना विनंती करते. आरक्षणाची मागणी करा. संवैधानिक अधिकाराने आंदोलने करा, मागणी करा. पण स्वत:चा जीव देऊ नका. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशंज आहोत. त्यांच्या नीतीनुसारच आपण लढलं पाहिजे. आत्महत्या पर्याय नाही, त्या वाटेने जाऊ नका, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा निरोपच नाही
मराठा समाजाला सरसगट आरक्षण मिळावे या करिता मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस आहे. आरक्षण संदर्भात चर्चा करण्यासाठी 21 जणांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांना अजूनही मुख्यमंत्र्यांकडून निरोप न आल्याने शिष्टमंडळ मुंबईला कधी जाणार हे मात्र आजुनही निश्चित नाही. याबाबत आज जरांगे पाटील बैठक घेणार आहेत. या शिष्टमंडळात काही वकील, विचारवंत, समन्वयक असे 13 आणि 8 गावकऱ्यांचा समावेश असणार आहे.