VIDEO: 5 जुलैपर्यंत 6 मागण्या मान्य करा, उद्रेक झाल्यास…; उदयनराजेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम
खासदार संभाजी छत्रपती यांच्यापाठोपाठ भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही (Udayanraje Bhosale) मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणावर तोडगा निघायला उशीर लागेल.
सातारा: खासदार संभाजी छत्रपती यांच्यापाठोपाठ भाजपचे खासदार उदयनराजे भोसलेही मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणावर तोडगा निघायला उशीर लागेल. तोपर्यंत आमच्या सहाही मागण्या मान्य कराव्यात. येत्या 5 जुलैपर्यंत या मागण्या मान्य करा, असा अल्टिमेटम देतानाच मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे. (Udayanraje Bhosale Letter To CM Uddhav Thackeray On maratha reservation)
उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांचं सहा मागण्यांकडे लक्ष वेधलं आहे. मी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधींना हात जोडून विनंती करतो, तुम्ही लोकशाहीतील राजे आहात. तुमच्या हातात सर्व धुरा दिली आहे. लोकांच्या तुमच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत. त्याला तडा जाऊ देऊ नका. आमच्या सहा मागण्या मान्य करा. नाही तर जनतेचा उद्रेक होईल. उद्रेक झाला तर त्याला राज्यकर्तेच जबाबदार असतील, असा इशारा उदयनराजे यांनी दिला.
दूध का दूध पानी का पानी करा
आम्ही वारंवार मागण्या केल्या आहेत. कोण काय करतंय आणि खोडसाळपणा कोण करतंय हे लोकांसमोर आलं पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन बोलवा. ते गरजेचं आहे. त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करा. म्हणजे कुणाची काय भूमिका आहे ते कळेल. दूध का दूध अन् पानी का पानी होईल. सध्या बंद खोलीत चर्चा होतेय. काय घडतंय ते कळत नाही. आत घडतं वेगळं आणि बाहेर सांगितलं जातं वेगळंच, अशी टीकाही त्यांनी केली.
तात्काळ पावलं उचला
येत्या 5 जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा. नाही तर परिणामांना सामोरे जा. मराठा आरक्षणाचा दिवसेंदिवस फारच गंभीर होत आहे. सरकारने वेळीच त्यावर पावलं उचलली पाहिजेत. मराठा आरक्षणाचा निर्णय होईल तेव्हा होईल, आधी सहाही मागण्या मान्य करा, अशी मागणी त्यांनी केली.
काय आहेत मागण्या?
>> आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांसाठी सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये Super Numerary Seats निर्माण करून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची तरतूद करावी. अनेक शैक्षणिक संस्थाच्या प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्यामुळे हा निर्णय अत्यंत तातडीने घेणे आवश्यक असून त्याबाबतची अधिसूचना तात्काळ काढावी. जेणेकरून मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न मार्गी लागेल.
>> मराठा आरक्षणाच्या अंतर्गत उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण झालेली असताना राज्य शासनाने 9 सप्टेंबर 2020 रोजी भरती प्रक्रियेला स्थागिती दिली. त्यामुळे राज्यातील 2185 उमेदवारांना शासनाने सेवेत सामावून घेतले गेले नाही. याबाबतीत शासनाने सदर उमेदवारांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे. ही बाब सरकारच्या अधिकारात असून सरकारने यात कसलाही हलगर्जीपणा न करता या उमेदवारांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे.
>> सारथी संस्था ही मराठा समाजातील विद्यार्थी, बेरोजगार तरूण तरूणींना शैक्षणिक आणि व्यवसायाची दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेवून मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘सारथी’ संस्थेची कार्यालये प्रत्येक महसूल विभागात सुरू करावीत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात ‘सारथी’ संस्थेची उपकेंद्रे सुरू करून त्याठिकाणी शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाचे उपक्रम राबवावेत. त्याकरीता संस्थेला कमीतकमी 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करून पायाभूत सुविधा उभ्या कराव्यात.
>> आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरूण-तरूणींच्या हाताला काम मिळावे तसेच स्वयंरोजगार निर्मीती करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी उद्योग-व्यवसाय निर्मितीचा कार्यक्रम हाती घ्यावा. त्याकरीता या महामंडळाला कमीतकमी 2 हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा. लाभार्थी पात्रतेसाठीची प्रक्रिया अधिक सुलभ करावी,महामंडळामार्फत व्याज परताव्याची 10 लाख रूपयांची मर्यादा वाढवून ती किमान 25 लाख रूपये करावी. याची अंमलबजावणी येत्या अधिवेशनाआधी करावी.
>> छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ 605 हून अधिक अभ्यासक्रमांना देण्याचा निर्णय हा गेल्या सरकारमध्ये झाला होता. ही अतिशय चांगली योजना आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी.
>> डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह भत्ता योजनेतून सुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सुमारे 100 कोटींचे लाभ गेल्या सरकारच्या काळात देण्यात आले होते. तसेच लाभ आताही देण्यात यावेत. प्रत्येक जिल्ह्यांत वसतिगृह उभारणे ही बाब पूर्णतः राज्य सरकारच्या अखत्यारीतील आहे. त्यावर तातडीने कारवाई करावी. जोवर वसतिगृह तयार होत नाहीत, तोवर हा भत्ता देण्यात यावा. (Udayanraje Bhosale Letter To CM Uddhav Thackeray On maratha reservation)
संबंधित बातम्या:
VIDEO: शिवसेनेला संपवल्याशिवाय राहणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्धार
राज्यपाल कोश्यारींना संजय राऊतांकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 12 आमदारांच्या नियुक्तीचीही आठवण!
(Udayanraje Bhosale Letter To CM Uddhav Thackeray On maratha reservation)