ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, पोलिसांकडून तीन पथके स्थापन
राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर मागील सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता.
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे वागळे इस्टेट येथील कार्यकर्ते आझम खान यांच्यावर मागील सोमवारी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी हल्लेखोरांची आणि त्यामागील सूत्रधारांची नावे देऊनही पोलिसांनी कारवाई न केल्याने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला. या इशार्यानंतर कापूरबावडी पोलीस सक्रीय झाले आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी तीन पथके गठीत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी आनंद परांजपे यांना दिली.
नेमकं प्रकरण काय?
आझम खान हे 12 जुलैला आपल्या पुतण्यासह भिवंडीच्या दिशेने काही कामानिमित्त जात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवार, लोखंडी सळई आदी हत्यारांच्या साहाय्याने हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये आझम खान हे गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यामागील सुत्रधार मुन्ना, लकी आणि अकबर नामक स्थानिक गुंड असल्याची माहिती आझम खान यांनी देऊनही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला होता.
पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शिष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली
पोलिसांनाी कारवाई न केल्याने आंदोलनासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते कापूरबावडी पोलीस ठाण्यावर धडकले. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी, आनंद परांजपे यांना आंदोलन न करण्यासंबधी विनंती केली. तसेच, पोलीस उपायुक्त विनय राठोड हे शिष्टमंडळाची भेट घेणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहर महिलाध्यक्षा सुजाता घाग, ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, शहर सरचिटणीस संदीप जाधव, ठाणे शहर युवाध्यक्ष विक्रम खामकर, आणि आझम खान यांची पोलीस उपायुक्त राठोड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांनी भेट घेतली.
आरोपींना लवकरच अटक करणार, पोलिसांचं आश्वासन
यावेळी राठोड यांनी, आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यांची ओळखही पटलेली आहे. त्यामुळे त्यांना काही तासांमध्येच अटक करण्यात येईल, असे सांगितले. तर, आनंद परांजपे यांनी, सदर भागामध्ये मुन्ना, लकी आणि अकबर नामक स्थानिक गुंडांची दहशत असून याआधीही त्यांनी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याला रिव्हॉल्वरने धमकावले होते. सदरचा हल्ला हा सुपारी देऊन झाला आहे. याची दखल घेऊन जर न्याय दिला नाही तर, आपण सत्तेत असूनही पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर उतरु, असा इशारा दिला.
हेही वाचा :