Ketaki Chitale: 10 दिवस तुरुंगाची हवा खाऊनही केतकीच्या चेहऱ्यावर हास्य कायम!
टीकेचा भडीमार, धमक्या, अटक, अंडीफेक, शाईफेक आणि अखेर पोलीस कोठडी झाल्यानंतरही केतकीच्या बाबतीत एक गोष्ट अजूनही कायम आहे आणि ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हास्य.
दहा दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आता अभिनेत्री केतकी चितळेची (Ketaki Chitale) न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. सात जूनपर्यंत तिला न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावण्यात आली आहे. टीकेचा भडीमार, धमक्या, अटक, अंडीफेक, शाईफेक आणि अखेर पोलीस कोठडी झाल्यानंतरही केतकीच्या बाबतीत एक गोष्ट अजूनही कायम आहे आणि ते म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हास्य. न्यायालयात हजर करण्यापूर्वी केतकीचा मेडीकल चेकअप (Medical Check Up) करण्यात आला. यावेळीही तिच्या चेहऱ्यावरील हास्य कायम होतं. तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांशी आणि पोलिसांशी ती हसत बोलताना दिसली. अटकेनंतर ज्यावेळी तिच्यावर अंडीफेक आणि शाईफेक झाली, तेव्हाही तिच्या चेहऱ्यावर अशा पद्धतीचं हास्य होतं.
पहा केतकीचा व्हिडीओ
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला 14 मे रोजी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीविरोधात फक्त ठाण्यातच नाही तर अनेक ठिकाणी केसेस दाखल झाल्या आहेत. त्यात गोरेगाव, नाशिक, पुणे, धुळे, उस्मानाबाद, अशा विविध ठिकाणांचा समावेश आहे. केतकीच्या पोस्टवरून राजकीय, सामाजिक आणि कलाक्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.
वाद आणि केतकी हे जणू समीकरणच बनलंय. याआधीही केतकी तिच्या पोस्टमुळे आणि वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिली. तिने ‘तुझं माझं ब्रेकअप’ आणि ‘आंबटगोड’ या मालिकांमध्ये काम केलंय. तिच्या कामापेक्षा केतकी वादामुळेच प्रकाशझोतात राहिली.