मुसळधार पावसाने उद्ध्वस्त केलं, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ठाणे महापालिका धावली, प्रत्यक्ष मदतीला सुरुवात
घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहे.
ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने पाठविण्यात आलेल्या आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाच्या पथकांचे प्रत्यक्ष कार्य सुरु झाले आहे. ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आज पहिल्याच दिवशी साफसफाई, आरोग्य तपासण्यांच्या कामाने वेग घेतला आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी 250 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने काम सुरु
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेची विविध पथके महाड आणि पोलादपूरसाठी रवाना करण्यात आली आहेत. या विविध पथकातंर्गत आजपासून प्रत्यक्ष कामाला जोरदार सुरुवात झाली आहे.
महापालिकेची ही पथके महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्या समन्वयाने उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली काम करत आहेत.
दिवसभरात 250 व्यक्तींची आरोग्य तपासणी
कुठलाही साथरोग उद्भवू नये, तसेच कोविडच्या संसर्गाचा वेळीच प्रतिबंध करता यावा यासाठी वैद्यकीय पथकामार्फत तपासण्या सुरु करण्यात आल्या आहेत. यामध्ये जवळपास 250 व्यक्तींची रॅपिड ॲटीजन टेस्ट, लेप्टोस्पायरोसीस तसेच मलेरिया तपासणी करण्यात आली आहे. चिखल्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांवर वैद्यकीय पथकामार्फत उपचार करण्यात येत आहेत.
विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कामाला सुरुवात
घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व परिसराची साफसफाई करण्यात येत आहे. फायलेरिया कर्मचाऱ्यांकडून सोडियम हायपोक्लाराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी 10 हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि पाण्याच्या बाटल्याच्या दोन ट्रकच्या माध्यमातून तेथील नागरिकांना पाणी वाटण्यात येत आहे. तसेच प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या माध्यमातून परिसराच्या साफसफाई करण्यात येत आहे. यासोबतच महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमच्यावतीने मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात येत आहे.
हेही वाचा :
पावसामुळे पुण्यातील 6 गावांचा संपर्क तुटला, नेटवर्क नसल्याने पंचाईत, ग्रामस्थांची मोठी गैरसोय
ठाणे महापालिकेचं ‘विशेष लसीकरण सत्र’, 300 रिक्षाचालकांचं लसीकरण