अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई, ठाणे महापालिकेची बेधडक मोहिम सुरुच
ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (16 सप्टेंबर) शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त करण्यात आले.
ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने धडक कारवाईची मोहिम व्यापक प्रमाणात सुरुच आहे. महापालिका प्रशासनाकडून गुरुवारी (16 सप्टेंबर) शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई करुन त्यांचे सामान जप्त करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली आहे. तसेच यापुढेही कारवाई सुरुच राहणार आहे.
दिव्यात ‘या’ भागांमध्ये कारवाई
या कारवाईतंर्गत दिवा प्रभाग समितीमधील रिव्हरवूड पार्क मेन गेट व रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले तसेच फुटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. यामध्ये अनधिकृत शेड तोडून 3 टपऱ्या, 3 हातगाड्या जप्त करण्यात आल्या. माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील बाळकुम कशेळी रोडवरील हातगाड्यावर कारवाई करुन 17 हातगाड्या जप्त करण्यात आल्या.
नौपाडा कोपरी प्रभाग समितीतही कारवाई
नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हॉटेल, गावदेवी तीन हात नाका, राममारुती रोड तलावपाळी, स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका, सुभाष पथ, जांभळी नाका कोर्ट नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले. लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीमधील वर्तकनगर नाका, रामचंद्र नगर, काजुवाडी या परिसरातील हातगाडी, फेरीवाले हटविण्यात आले.
उथळसर प्रभाग समितीमधील फ्लॉव्हर व्हॅली, सर्व्हिस रोड, नारळीपाडा, पाचपाखाडी येथील पदपथांवरील 3 टपरी हटवून सामान जप्त करण्यात आले. वागळे प्रभाग समितीमधील किसन नगर येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून 13 हातगाडया, 4 लाकडी बाकडे, 2 टपरी, 1 वजन काटा, 1 शेगडी असे सामान जप्त करण्यात आले.
संबंधित कारवाई ‘या’ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली
सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर,अलका खैरे, महेश आहेर आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.
महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावरील हल्ल्यानंतर कारवाई कडक
महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरिवाल्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत फेरिवाल्यांवरील कारवाई सुरुच ठेवली आहे. गेल्या आठवड्यापासून ठाण्यात अनधिकृत फेरिवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वत: महापौर नरेश म्हस्के यांनी घटनास्थळी जाऊन या कारवाईची पाहणी केली होती.
अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाईमुळे हल्ला, कल्पिता पिंपळेंचा दावा
कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला होता. ठाण्यातील फेरिवाल्यांवर कारवाई सुरु असताना कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटं तुटली. तर त्यांच्या अंगरक्षकही या हल्ल्यात जखमी झाला असून त्याचं एक बोट तुटलं आहे. पिंपळे यांच्यावर मागील 8 दिवसांपासून ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आज पिंपळे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर पिंपळे यांनी आपल्यावरील हल्ला हा अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे झाल्याचा खळबळजनक दावा केलाय. फेरिवाल्यांवरील कारवाई हे एक कारण असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा :