राज ठाकरे अविनाश जाधव यांच्यासारखी तोडीस तोड जबाबदारी कुणाला देणार? मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अविनाश जाधव यांची नेतेपदी नियुक्ती केली आहे. जाधव हे गेल्या काही वर्षांपासून ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. पण आता त्यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याने जाधव यांच्या तोडीस तोड असा मनसैनिक कोण असेल ज्याला ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात येऊ शकते? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.
ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात आगामी काळात अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये महापालिकेच्या निवडणुकीचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबई, ठाणे, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली यासह अनेक महत्त्वाच्या शहरांच्या महापालिका निवडणुकींकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. या निवडणुकांना मिनी विधानसभा निवडणुका असंही मानलं जातं. कारण या निवडणुकांमधून महाराष्ट्रातील जनतेचा नेमका मूड काय आहे ते लक्षात येतं. कारण या निवडणुका पार पडल्यानंतर लगेच पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून जोरदार तयारी केली जात आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागलाय. या दरम्यान ठाण्यातून मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येतेय.
ठाण्यात मनसे म्हटलं की अविनाश जाधव असंच नाव पुढे येतं. ठाणे मनसे आणि अविनाश जाधव असं समीकरणच गेल्या काही वर्षांमध्ये निर्माण झालेलं बघायला मिळत आहे. अविनाश जाधव यांनी ठाण्यात अनेक लोकपयोगी कामं केली. अनेक आंदोलनंदेखील केली. अनेकदा पक्षासाठी अंगावर केसेस देखील झेलल्या आहेत. त्यामुळे अविनाश जाधव यांच्याबद्दल पक्षात एक वेगळं स्थान आहे.
अविनाश जाधव यांच्यावर मनसेच्या ठाणे आणि पालघर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी आहे. पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेत काही संघटनात्मक बदल करण्यात येत आहे. त्याची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली असून त्याचा प्रत्यय मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बघायला मिळालाय.
मनसेच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदासाठी ‘या’ नावांची चर्चा
नुकत्याच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जर त्यांच्याजागी नवा जिल्हाध्यक्ष नेमायचा झाल्यास कोण होणार? याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
नवी मुंबई हे ठाणे जिल्हाध्यक्षाच्या अधिकार क्षेत्रात येते. त्यामुळे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नावाची ठाणे जिल्हाध्यक्ष पदासाठी जोरदार चर्चा सुरु आहे. तर अमित ठाकरेंचे जवळचे असणारे मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांचे नाव देखील शर्यतीत आहे.
मात्र अविनाश जाधव आणि गजानन काळे यांच्यातील मतभेद संपूर्ण महाराष्ट्राला सर्वश्रूत आहेत. त्यामुळे मनसेचा ठाणे जिल्हाध्यक्ष बदलला जाणार की अविनाश जाधव यांच्याकडेच नेतेपदासह जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी राहणार? या चर्चेवर राज ठाकरे परदेशातून परतल्यावरच पडदा पडेल.