पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेसकडून दलित नेत्याला संधी, चरणजितसिंह चन्नींच्या नावाची घोषणा
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. (Charanjit singh channi to be new punjab chief minister)
चंदीगड: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत असतानाच काँग्रेसने धक्कातंत्राचा वापर करत मुख्यमंत्रीपदासाठीचं नवं नाव जाहीर केलं आहे. पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे विधीमंडळ गटनेते म्हणूनही निवड करण्यात आल्याचं हरीश रावत यांनी जाहीर केलं आहे. (Charanjit singh channi to be new punjab chief minister)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांनी ट्विट करून चरणजीतसिंग चन्नी मुख्यमंत्री होणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसेच संध्याकाळी साडे सहा वाजता चेन्नी हे राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापन्याचा दावा करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
रंधावा चर्चेत, माळ चन्नींच्या गळ्यात
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी वेगवेगळी नावं चर्चेत होती. त्यात दुपारनंतर सुखजिंदरसिंग रंधावा यांचंच नाव सर्वाधिक चर्चेत होतं. तेच मुख्यमंत्री होतील अशी जोरदार शक्यता होती. पण काँग्रेसमध्ये होईपर्यंत काही खरं नसतं असं सांगितलं जातं. तसच पुन्हा घडलंय. कारण चरणजितसिंह चन्नी यांचं नाव फारसं चर्चेत नसताना, मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलीय. काँग्रेसच्या आमदारांसोबत बैठक केल्यानंतर चरणजितसिंह चन्नी यांच्या नावाची घोषणा केली गेलीय.
कोण आहेत चरणजितसिंग चन्नी?
चरणजितसिंह चन्न हे रामदासिया ह्या शीख कम्युनिटीतून येतात. अमरींदरसिंह यांच्या मंत्रीमंडळात ते कॅबिनेट मंत्री होते. औद्योगीक आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ते तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि चमकूर साहीब हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. 2015 ते 16 साली, वर्षभरासाठी चरणजितसिंह चन्नी यांनी पंजाबचे विरोधी पक्ष नेते म्हणूनही काम केलेले आहे. चरणजितसिंह चन्नी हे दलित समुदयातून आहेत आणि कॅप्टन अमरींदरसिंह यांचे कडवे विरोधक मानले जातात.
दलित व्होट बँकेवर डोळा?
चरणजितसिंह हे 48 वर्षांचे आहेत. पंजाबमध्ये दलितांची टक्केवारी ही 30 टक्क्यांच्या आसपास आहे. आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत ही सर्व मतं निर्णायकी ठरतील असा अंदाज बांधून चन्नींना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आल्याचं जाणकार सांगतायत.
चेहरा आणि वाद
चन्नी हे काँग्रेसचा पंजाबमधील दलित चेहरा आहे. ते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे निकटवर्तीय होते. नंतर ते कॅप्टन यांच्या विरोधात गेले. 2017मध्ये चन्नी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री बनले होते. ते स्वत: 12 वी पास आहेत. त्यामुळे वाद झाला होता. त्यामुळे त्यांनी 2017मध्ये पंजाब विद्यापीठातून पदवी मिळवली होती. अत्यंत साधा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. दलित चेहरा आणि शीख चेहरा म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत चन्नी यांचा काँग्रेसला किती फायदा होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.
कॅप्टन अमरिंदरसिंह काय करणार?
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाल्यानंतरही कॅप्टन अमरींदरसिंह यांचा राजकीय वाद मिटलेला नाही. मुख्यमंत्री आपल्याच गटाचा व्हावा म्हणून सिद्धू आणि कॅप्टन गट आज दिवसभर सक्रिय होते. माझ्याच गटाचा मुख्यमंत्री करा नाही तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जा अशी धमकीच कॅप्टन अमरींदरसिंह यांनी दिलीय. त्यानंतर काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी अमरींदरसिंह यांना पत्र लिहून काँग्रेसला हाणी होईल असं काही करु नका अशी विनंती केली. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर चरणजितसिंह चन्नी यांनी मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आलीय. आणि ते अमरींदरसिंह यांचे कट्टर विरोधक राहीलेले आहेत. याचाच अर्थ अमरींदरसिंह गटाचा मुख्यमंत्री करण्यात आलेला नाही. त्यामुळे पंजाबमध्ये फिल्म अभी बाकी है मेरे दोस्त अशी स्थिती असल्याचं दिसतंय.
It gives me immense pleasure to announce that Sh. #CharanjitSinghChanni has been unanimously elected as the Leader of the Congress Legislature Party of Punjab.@INCIndia @RahulGandhi @INCPunjab pic.twitter.com/iboTOvavPd
— Harish Rawat (@harishrawatcmuk) September 19, 2021
संबंंधित बातम्या:
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, गांधी घराण्याशी घनिष्ठ संबंध; कोण आहेत सुखजिंदरसिंग रंधावा?
(Charanjit singh channi to be new punjab chief minister)