Omicron cases: महाराष्ट्रासह देशात लॉकडाऊन परततोय, कोणत्या राज्यात कोणते निर्बंध?; नव्या वर्षात बाहेर जाण्याचा विचार करताय तर हे नियम वाचा
देशभरात ओमिक्रॉनचं संकट वाढताना दिसत आहे. देशात ओमिक्रॉनचे 400 हून अधिक रुग्ण आढळल्याने दहा राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
नवी दिल्ली: देशभरात ओमिक्रॉनचं संकट वाढताना दिसत आहे. देशात ओमिक्रॉनचे 400 हून अधिक रुग्ण आढळल्याने दहा राज्यांना अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र, यूपी, हरियाणा, मध्यप्रदेश आणि कर्नाटकासहीत अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच केंद्र सरकार आरोग्य खात्यांची एक टीम राज्यांमध्ये पाठवून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.
महाराष्ट्रात कठोर निर्बंध
महाराष्ट्रात कोरोनाचे 577 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नाताळमध्ये गर्दी वाढून रुग्ण संख्या वाढू नये म्हणून राज्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईत पार्टी, लग्न समारंभातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली असून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशात नाईट कर्फ्यू
उत्तर प्रदेशातही कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. योगी आदित्यनाथ सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लागू केली आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरजिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 6 डिसेंबर ते 2 जानेवारी 2022पर्यंत उत्तर प्रदेशात जमावबंदी लागू राहणार आहे.
दिल्लीतही कार्यक्रमांवर बंदी
ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने दिल्लीतही कठोर निर्बंध लावण्यता आले आहेत. नाताळ आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला धार्मिक स्थळ उघडे राहतील. पण कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे. दिल्लीतील सर्व हॉटेल्स 50 टक्के क्षमतेनेच सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विवाह समारंभाला केवळ 200 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
गोव्यातही रात्रीची संचारबंदी
गोव्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातही प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून नाईट कर्फ्यू जारी केला आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क लावणे गोव्यात बंधनकारक करण्यात आलं आहे.
गुजरातच्या आठ शहरात नाईट कर्फ्यू
गुजरातमध्येही ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला आहे. गुजरातमध्या आतापर्यंत 50 लोकांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे राज्यातील अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, राजकोट, वडोदरा, भावनगर, जामनगर आणि जुनागडमध्ये येत्या 31 डिसेंबरपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा नाईट कर्फ्यू असणार आहे. तसेच राज्यात 75 टक्के क्षमतेने रेस्टॉरंट सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तर लग्न समारंभाला 400 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कर्नाटकमध्ये कलम 144 लावण्याचा सल्ला
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या आणि गर्दी होण्याची शक्यता असल्याने हे निर्बंध लावण्यात आले आहे. राज्यात 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तसेच कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच हॉटेलात प्रवेश दिला जाणार आहे. या आधी कर्नाटकाच्या टीएसी समितीने राज्यात 144 कलम लागू करण्याचा सल्ला दिला होता. तसेच नाताळची प्रार्थना केवळ चर्चमध्येच व्हावी, सार्वजनिक ठिकाणी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यास मनाई करण्यात यावी, असा सल्लाही या तांत्रिक सल्लागार समितीने दिला होता.
मध्यप्रदेशात नाईट कर्फ्यू
ओमिक्रॉनचा एकही रुग्ण न सापडलेलं गोव्यानंतरचं मध्यप्रदेश हे दुसरं राज्य आहे. मात्र, राज्यातील 20 जणांचे सँपल जीनोम सिक्वेसिंग टेस्टसाठी पाठवले आहेत. राज्यात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना निर्बंधांचं कठोर पालन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.
पद्दुचेरीत 2 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन
पद्दुचेरीत येत्या 2 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच पद्दुचेरीत नाईट कर्फ्यूही लागू करण्यात आला आहे. रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. मात्र, नाताळच्या दिवशी नाईट कर्फ्यूत थोडी शिथिलता देण्यात आली आहे. शिवाय नव वर्षाच्या पूर्वसंध्येलाही राज्यात निर्बंधामध्ये काही शिथिलता देण्यात येण्याची शक्यता आहे. तेलंगनामध्येही कडक प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. तेलंगनाच्या राजन्ना सिरसिला जिल्ह्यात 10 दिवसांसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सिरसिला जिल्ह्यातील गुडेम गावातही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 25 December 2021 pic.twitter.com/cW4dJCku5R
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2021
संबंधित बातम्या:
Rajesh Tope: राज्यात नवे नियम, ओमिक्रॉनचा धोका वाढला, शाळांचं काय होणार? टोपेंचं सविस्तर स्पष्टीकरण
Omicron | ‘तिसरी लाट आली तर ती ओमिक्रॉनचीच असेल’, राजेश टोपेंनी सांगितलं तिसऱ्या लाटेचं गणित
Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित