PM Security Breach: पंजाबचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिवांना निलंबित करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेत त्रुटी निर्माण झाल्याचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून पंजाबचे पोलीस महासंचालक आणि मुख्य सचिवांना निलंबित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सचिव एनव्ही रमण्णा यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी या प्रकरणाशी संबंधित एक जनहित याचिका कोर्टात दाखल केली आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटी स्वीकार्ह होऊ शकत नाही. पंजाब सरकारने या प्रकरणी जबाबदारी फिक्स करावी आणि संबंधितांवर कारवाई करावी असे निर्देश पंजाब सरकारला देण्याची विनंती या याचिकेतून कोर्टाला करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी पंजाबचे मुख्य सचिव अनिरुद्ध तिवारी आणि पोलीस महासंचालक सिद्धार्थ चटोपाध्याय यांना निलंबित करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई केल्यास भविष्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही चूक राहणार नाही, असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.
समिती स्थापन
दरम्यान, या घटनेची पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चन्नी यांनी उच्च स्तरीय समिती स्थापन केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत निवृत्त न्यायाधीश मेहताब सिंह गिल आणि प्रमुख सचिव (गृह आणि न्याय) अनुराग वर्मा आदींचा समावेश आहे. तीन दिवसात या समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पंजाबच्या दौऱ्यावर होते. भंटिडा एअरपोर्टवरून हेलिकॉप्टर ऐवजी त्यांना रस्तेमार्गे जायचं होतं. त्यांना सर्वात आधी हुसैनीवाला येथे राष्ट्रीय शहीद स्मारक येथे जायचं होतं. मात्र, त्यापूर्वीच अर्धा तासआधी एका उड्डाणपुलावर मोदींचा ताफा अडकला. काही आंदोलकांनी रस्ता रोको केला होता. त्यामुळे या ताफ्याला सुरक्षेच्या कारणास्तव माघारी परतावे लागले होते. त्यावर मोदींनी संताप व्यक्त केला. मी जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, अशी संतप्त प्रतिक्रिया मोदींनी व्यक्त केली. त्यानंतर पंजाब सरकारने एसएसपीला निलंबित केलं होतं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 6 January 2022https://t.co/n5auhcslqG#corona | #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 6, 2022
संबंधित बातम्या:
पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी, फिरोजपूरचा एसएसपी निलंबित; पंजाब सरकारची तडकाफडकी कारवाई
Punjab | अडकले मोदी, आठवले गांधी! नेमका काय आहे हा प्रकार जो पुन्हा पुन्हा ट्रेन्ड होतोय?