VIDEO: मुख्यमंत्री खुर्चीवर नसताना राज्य व्यवस्थित सुरू, कारण राज्यपाल सक्रिय; रावसाहेब दानवेंचा टोला
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले नाहीत. तरीही राज्य व्यवस्थित सुरू आहे.
नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर बसलेले नाहीत. तरीही राज्य व्यवस्थित सुरू आहे. कारण राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
रावसाहेब दानवे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. मुख्यमंत्री खुर्चीवर नाहीत तरी राज्य व्यवस्थित सुरू आहे. खरं तर आताच राज्य व्यवस्थित सुरू आहे. त्याचं कारण आहे की राज्यपालांची भूमिका सक्रिय आहे. आता मुख्यमंत्री या राज्याचा खुर्चीवर नसताना राज्य चांगलं चाललं तर याचं श्रेय या राज्यातील शांतता, संयमी आणि सहनशील जनतेचं आहे. सरकारचं नाही, असा टोला दानवे यांनी लगावला आहे.
ते सत्तारांचं वैयक्तिक मत
उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचं विधान शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी केलं होतं. त्यावर दानवे यांनी भाष्य करणं टाळलं. ते अब्दुल सत्तार यांचं वैयक्तिक मत आहे, असं दानवे म्हणाले.
गळाभेटीने चर्चांना उधाण
दरम्यान, सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तो, आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
रेल्वेसाठी दानवेंची भेट
या भेटीनंतर सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. मतदारसंघाचे खासदार झाले तर आनंद होईल. मी गंभीर नाही असं दानवे बोलतात. आता मी त्यांना रडत रडत सांगने, असं मिष्किल विधानही त्यांनी केलं.
संबंधित बातम्या:
VIDEO: युती होणार की नाही? शिवसेनेतच जुंपली; चंद्रकांत खैरेंनी सत्तारांना फटकारलं