लेख: बाप नावाचं हळवं पान…
भारतीय विचारधारेचे अनेक पालक आपल्या मुलांचे विशेषतः मुलीचं लग्न हे सगळ्यात मोठं कर्तव्य समजतात. अर्थात ते खरंच आहे. नुकतेच आपण सगळे कोरोनाच्या जीवघेण्या काळातून जात आहोत.
भारतीय विचारधारेचे अनेक पालक आपल्या मुलांचे विशेषतः मुलीचं लग्न हे सगळ्यात मोठं कर्तव्य समजतात. अर्थात ते खरंच आहे. नुकतेच आपण सगळे कोरोनाच्या जीवघेण्या काळातून जात आहोत. या काळात अनेक बाप आपल्या वयात आलेल्या मुला-मुलींच्या लग्नाचा सोहळा मनोमन सजवतायेत. तर काही आजही आपल्या मुलीचं लग्न कसं करावं या विचारात आहेत. मुलीच्या लग्नात काही कमी पडायला नको हा अनेक वडिलांचा पहिला विचार असतो. त्यामागे याआधी सूनांची झालेली अवहेलना ही प्रत्येक बापानं बघितलेली असते. म्हणून कुठलीही गोष्ट कमी पडू नये. इतकी काळजी मुलीच्या लग्नात प्रत्येक बाप घेत असतो. वेळप्रसंगी जावयाच्या समोर हात जोडायला देखील तो कमी पडत नाही. हे आपण सगळ्यांनी पाहिलंय.
कोरोनाच्या या कळात अनेक बाप आपल्या मुलीच्या लग्नाची स्वप्न बघतं असतानाच काळाने हिरावून नेले. तर काही बापलोक मास्क बांधून आजही लोकलच्या दारात, बसमध्ये धक्के खावून पैपई जमवत आहेत. त्यासगळ्या बापांच्या कष्टाला तोड नाही. नुकतेच अतिशय आक्रमक, जाज्वल्य विचारधारेच्या दोन नेत्यांच्या मुलींची लग्न पहिली. राजकारणाच्या रणांगणात सगळं दावणीला बांधून निघालेल्या या दोन बापांचं विशेष असं कौतुक नाही. परंतु त्यांनी केलेलं प्रत्येक विधान… अँक्शनची आजवर बातमी होत राहिली म्हणूनच..
2019 पर्यंत राजकारणाच्या पटलावर एकमेकांचे कट्टर विरोधक, एकमेकांच्या विचारधारेचे कट्टर शत्रू म्हटलं तरी चालेल इतके परस्पर विरोधी आणि भिन्न विचारांनी प्रेरित असलेले संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांनी आपल्या मुलीची नुकतीच पाठवणी केली.
थेट ममता बॅनर्जींना मुलीच्या लग्नात बोलावून धडाक्यात 2-3 स्वागत सोहळे करणारे अग्रलेखंचा बुलंद आवाज संजय राऊत यांच्या मुलीचं लग्न आपण पहिलं. किमान पाव किलो वजन असलेली राऊतांची लग्न पत्रिका पाहिल्यावर घरातल्या पहिल्या लग्नाची आणि त्यातही मोठ्या मुलीच्या लग्नाची किती तयारी या बापाने केली असेल याचा सहज अंदाज आला. राजकीय व्यासपीठावर अग्रलेखाचे बाण सोडून विरोधकांना घायाळ करणारे संजय राऊत आपल्या मुलीच्या लग्न सोहळ्यात कॅमेरामनच्या सूचनाही पाळताना दिसले. लग्नाच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक व्हिडीओमध्ये पाहुण्यांच स्वागत आणि खातिरदारी अतिशय नेमाने राऊतांनी केली हे वेगळं सांगायची गरज नाही. अगदी सुरवातीलाच म्हटल्या प्रमाणे कुठलीच कसर लेकीच्या लग्नात राऊतानी सोडली नाही. अर्थात आपल्या घरातील मुलीचं लग्न कसं करावं हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक आणि खासगी प्रश्न. परंतु हे लग्न मस्त व्हावं. ही प्रत्येक बापाची इच्छा आणि त्याला राऊत तरी का अपवाद ठरतील?
नुकतेच विशेष विवाह कायद्यांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसची बुलंद तोफ असणाऱ्या जितेंद्र आव्हाडांच्या घरीही सनईचा सुर ऐकू आला. (अर्थात सनई नव्हे तर मुलीच्या लग्नाआधी घरच्या देवाचा गोंधळ आम्ही पहिला) हिंदू विरोधी, धर्मांध अशी जी टीका आव्हडांवर गेल्या अनेक वर्षांपासून होत आली त्या टीकाकारांच्या मनात देवाचा हा गोंधळ बघून नक्कीच गोंधळ झाला असेल. अर्थात आजवर त्यांनी कायम पुरोगामी विचारधारेचा पुरस्कारच केला आणि थोतांड, अंधश्रध्देच्या तितकाच तीव्र विरोधही. परंतु आव्हाडांनी सर्व धार्मिक रितीरिवाज, घरातील देवाचे सोहळे पाळत लग्नाआधीच सर्व धार्मिक विधी पूर्ण केल्या. एकुलत्या एका मुलीचं लग्न निर्विघ्न पार पडू दे. या भावनेतून अगदी पारंपरिक पद्धतीने एका जितेंद्र आव्हाड नावाच्या बापानं घातलेला हा गोंधळ सामान्य बापाच्या मनातील सर्व भावना सांगून गेला.
आव्हाडांच्या मुलीच्या लग्नात एक विशेष वेगळेपण नक्कीच होते. अगदीच हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाह सोहळा पार पडला. खरतर कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून लाखो लोकांना जेवू घालणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुलीच्या लग्नाचा बार उडवणं सहज शक्य होतं. परंतु केवळ मुलीच्या इच्छेखातर त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने हा विवाह सोहळा साजरा केला. यावेळी त्यांच्या मुलीचंही विशेष कौतुक नक्कीच करावं लागेल. कारण करोडपती बाप असताना साधेपणा जपणं प्रत्येकाला जमत नाही. नाहीतर बापाच्या provident फंडाचे पैसे काढून त्यावर प्रिवेडिंगचे फोटो शूट करणाऱ्या अनेक पप्पांच्या पऱ्या आपण पहिल्याच आहेत. तसंच सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करून पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत सोहळे करणारे राजकारणीही आहेतच. त्यामुळे साधेपणाचा आदर्श लोकांसमोर विशेषतः राजकारण्यांना समोर ठेवण्याच्या जितेंद्र आव्हाडांच्या कन्येच कौतुक करायलाच पाहिजे.
सरतेशेवटी संजय राऊतांनी मुलीच्या लग्नात खासदार सुप्रिया सुळेंच्या सोबत अगदी मनसोक्त नाचून आपली मुलगीही आपल्या खांद्यावरच ओझ नव्हतं तर माझा अभिमान होती हे दाखवून दिलं. तर, अंगावर आलेल्या विरोधकांना थेट शिंगावर घेणाऱ्या बेडर आव्हाडांनी ‘जा मुली जा, दिल्या घरी सुखी रहा….’ म्हणत ढसाढसा रडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. या दोन्ही नेत्यांना राजकीय व्यासपीठावर पहिलं की ते इतके हळवे असतील असा विचार येणारच नाही.
असो, घराला घरपण मुली देतात, आई बाप मेल्यावर हंबरडा फोडून कान उघडणाऱ्या मुली असतात. त्यामुळे प्रत्येक मुलीचा पहिला हिरो हा तिचा बाप असतो आणि प्रत्येक बापाची आई ही आपल्या मुलीत असते. जी त्या बापाची काळजी घेते, रडते, ओरडते आणि शेवटी बापाच्या कुशीतच आपलं विश्व शोधते. त्यामुळे मुलगा झाला की वंश वाढण्याचा अभिमान बाळगणाऱ्या बापलोकांच्या विश्वात हळव्या बाप नावाचे एक पान असतं हे मात्र नक्कीच अधोरेखित होतं.
लेखक: स्नेहील शिवाजी झणके मो.9892763658 (लेखक हे tv9 वृत्तवाहिनीत वृत्त निवेदक आहेत)