Photo | सरपंच, उपमुख्यमंत्री ते केंद्रीय मंत्री, गोपीनाथ मुंडेंचा थक्क करणारा प्रवास
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती.
Follow us
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती.
गोपीनाथ मुंडे यांचं लहाणपण अतिशय गरिबीत गेलं. पुढे शिक्षणाच्या निमित्ताने ते पुण्यात गेले. पुण्यात गेल्यानंतर त्यांचा राजकारणाशी जवळून संबंध आला. पुढे नाथ्रा या गावचे ते सरपंच झाले. सरपंचपदापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात झाली.
सरपंच झाल्यानंतर त्यांनी गावासाठी अतिशय चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांनी पुढे बीड जिल्हा परिषदेला आपलं नशीब आजमावलं. 1980 साली गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले.
दरम्यान, 1980 ते 1982 साली त्यांनी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद भूषवलं. पक्ष संघटनेची जबाबदारी त्यांनी इतकी मजबूत सांभाळली की ते पक्षाचा प्रमुख चेहरा बनले. भारतीय जनता पक्षाला शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून विरोधक हिणवायचे, त्या काळात बहुजनांना पक्षात सामील करुन, त्यांना नव्या संधी देत वाड्या-वस्त्यांवर तांड्यावर जाऊन भाजपचे विचार त्यांनी जनमाणसात रुजवले.
पुढे 1995 ला भाजप शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर त्यांनी मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. राज्यातील लोकांच्या हिताचे प्रश्न मांडणारा नेता म्हणून त्यांची ओळख झाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीने बोलणारा नेता म्हणून लोक त्यांना ओळखायला लागले. त्यांच्या सभांना अलोट गर्दी व्हायचे. आपल्या वाणीने त्यांनी हजारोंच्या सभा जिंकल्या.
1990 ते 1995 हा मुंडे यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. 1992 ते 1995 या काळात त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं. याच काळात त्यांनी आपलं नेतृत्व कौशल्य सिद्ध करत प्रमुख पदावर दावा सांगितला. पुढे 1995 ला त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 1995 ते 1999 साली त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं.
पुढे 2009 साली त्यांनी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. 2009 आणि 2014 साली त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. 2014 साली भाजपचं सरकार सत्तेवर आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्यावर मोदींनी ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी दिली. अनेक वर्षानंतर गोपीनाथ मुंडे मंत्री बनले होते. याच काळात गोरगरिबांची अनेक कामे त्यांना मार्गी लावायची होती.
पण काळाने घात केला. मंत्रिपदाची शपथ घेऊन एक महिनाही होत नाही तोपर्यंतच त्यांना हे जग सोडून निघून जावं लागलं. 3 जून 2014 साली त्यांचं अपघाती निधन झालं.