Harbhajan Singh Retire: कदाचितच हरभजनचा हा विक्रम कोणी मोडू शकेल
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
Follow us
सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या हरभजन सिंगने कसोटी क्रिकेटमध्ये 103 सामन्यात 417 विकेट घेतल्या. 236 वनडे सामन्यात 227 विकेट घेतल्या. टी-20 या छोट्या फॉर्मेटमध्ये हरभजनने 28 सामन्यात 25 विकेट घेतल्या. 1998 साली शारजामध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सामन्यातून हरभजनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हरभजनने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
2011 मध्ये हरभजन सर्वात कमी वयात 400 कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला. त्याने डॉमिनिकाच्या कार्लटन बॉ ला आऊट करुन 400 विकेटचा पल्ला गाठला होता. सर्वात कमी वयात 400 विकेट घेण्याची कामगिरी करणारा हरभजन भारतीय गोलंदाज ठरला होता. त्यावेळी हरभजनचे वय 31 वर्ष चार दिवस होते. जगातील अन्य गोलंदाजाच्या तुलनेत हरभजन दुसऱ्या स्थानावर आहे. हरभजनच्याआधी श्रीलंकेच्या मुरलीधरनने 400 विकेट घेतले होते. त्यावेळी मुरलीधरनचे वय 29 वर्ष 273 दिवस होते.
कसोटी क्रिकेटमध्ये तीन चेंडूत तीन विकेट घेऊन हरभजनने हॅट्ट्रीक रचली होती. अशी कामगिरी करणारा हरभजन पहिला भारतीय गोलंदाज आहे. मार्च 2001 मध्ये कोलकात्ता कसोटीत त्याने ही कमाल केली होती. हरभजनने रिकी पाँटिंग, गिलख्रिस्ट आणि शेन वॉर्न यांना लागोपाठच्या तीन चेंडूंवर बाद केले होते. त्यानंतर इरफान पठानने 2006 आणि जसप्रीत बुमराहने 2019 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक रचली.
हरभजन सिंग तीन कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज आहे. 2001 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने 32 विकेट घेतल्या होत्या. जगातील अन्य कुठलाही गोलंदाज तीन कसोटीत 32 विकेट घेऊ शकलेला नाही. हरभजननंतर मुरलीधरनचे नाव येते. त्याने तीन कसोटीत 30 विकेट घेतल्या होत्या.