दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर, आशिष शेलारांचा घणाघात
"एवढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर अशी मुंबईची स्थिती झाली आहे", असा सनसनाटी टोला भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.
मुंबई : “आज 26 जुलै दुर्दैवाने मुंबईकरांच्या कायमचा लक्षात राहणारा दिवस आहे. 26 जुलै 2005 च्या पुराला आज 16 वर्ष उलटूनही परिस्थिती काही बदलली नाही. एवढे वर्ष सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईकरांशी गद्दारी आणि फितुरी केली आहे. दरवर्षी निसर्गावर खापर आणि काही लोकांच्या घरावर सोन्याचं छप्पर अशी मुंबईची स्थिती झाली आहे”, असा सनसनाटी टोला भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे.
हे पैसे गेले कुठे?
“कोकण आणि साताऱ्यातील परिस्थिती पाहतो आहे. चिखलाचे डोंगर, मृत्यूचं थैमान हे पाहून मुंबईत शिवसेनेला काही करावं असं वाटतं नाही. कधी 20 हजार, कधी 30 हजार कधी 35 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला. गेल्या 16 वर्षात सरासरी 20 हजार कोटींचा अर्थसंकल्प जरी धरला तर 16 वर्षात 3 लाख 20 हजार कोटीचा अर्थसंकल्पीय निधी खर्च मुंबईकरांसाठी केला. मात्र खर्च करून चित्र काय आहे? मग हे पैसे गेले कुठे? सत्ताधारी शिवसेनेला याचं उत्तर द्यावं लागेल”, असं आशिष शेलार म्हणाले.
शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल
“चितळे कमिटी, आयआयटीच्या अहवालाचं काय झालं? त्यावेळी चितळे समितीने ज्या शिफारशी केल्या होत्या त्याचे काय झाले? मुंबईतले पानलोट क्षेत्र मोजलंय का? मिठीनदीवरील अतिक्रमण हटवलं का? पम्पिंग स्टेशनचं काय झालं? आयआयटी पवईचा अहवाल पाण्यात बहुदा भिजून गेला. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे सत्ताधीशांना द्यावी लागणार आहेत. जनतेकडून शिवसेनेकडे हिशोब मागण्याचं काम भाजप करेल”, असंदेखील आशिष शेलार म्हणाले.
संबंधित बातम्या :