उद्धव ठाकरेंना सत्ता जाण्याची भीती म्हणूनच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत; दरेकरांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
सोलापूर: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरे तर त्यांचा तात्काळ राजीनामा घ्यायला हवा होता. पण सरकारने राजीनामा घेतला नाही. संजय राठोड यांच्यावर आरोप होताच त्यांचा राजीनामा घेतला. पण राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेईल की काय या भीतीने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई होत नाही. केवळ सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती आरोप केला आहे. तसेच भविष्यात भ्रष्टाचाराने बरबटलेल्या लोकांसोबत आम्ही जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
भाजपने नवाब मलिक हटाव, देश बचाव हे अभियान सुरू केलं आहे. देशभक्तीच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आलं आहे. भाजपकडून सूडनाट्याने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप महाविकास आघाडी करत आहे. हा आरोपच चुकीचा आणि निराधार आहे. आघाडीचा हा आरोप खोडून काढण्यासाठीच हे अभियान हाती घेण्यता आलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाला. ते तुरुंगात गेले. त्याच्याशी भाजपचा कोणताही संबंध नाही. ठाण्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी परदेशात व्यवहार केला. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली. तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी एका मुलीला आत्महत्या करायला भाग पाडलं. हसन मुश्रीफ यांच्या जावयाने टेंडर घेतले. त्यांच्यावर आरोप झाले. नवाब मलिकांनी सोमय्यांना आयटम गर्ल म्हटले. नारायण राणे आणि नितेश राणेंवर कारवाई झाली. जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे यांना मारहाण केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. यात भाजपने कुठेही तक्रार केली नव्हती. या सर्व प्रकरणात भाजपचा संबंध काय? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी केला.
धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतोय
नवाब मलिकांना देशभक्त दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. एकीकडे स्वत:ला पुरोगामी म्हणायचे आणि दुसरीकडे मुस्लिमांवर कारवाई होत असल्याचा या प्रकरणाला रंग द्यायचा हे योग्य नाही. मलिक यांनी सलिम पटेल आणि शाहवली खान यांच्यामार्फत जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार झाली आहे. मुनीरा पटेल यांना पैसे न देता मुनीर पटेल आणि शाहवली खान यांनी कुलमुख्त्यार केले. यात नवाब मलिक यांचा संबंध उघड झाला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली, असं त्यांनी सांगितलं.
भाजपने कस्टडी दिली नाहीये
विना समन्स अटक करता येत नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यावर कोर्टाने PMLA (19) ॲक्टनुसार कारवाई केल्याचं स्पष्टपणे सांगितलं. मनिलॉंड्रिंगमध्ये अडकल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. भाजपने नव्हे तर न्यायालयाने मलिकांना कस्टडी दिलीय. अतिरेक्यांना पैसे पुरवण्याचे काम कोणी केले हे समोर आले आहे, असंही ते म्हणाले.
म्हणजे मलिक आरोपी होत नाही
एका बाजूला साधूंसंताचा महाराष्ट्र सांगायचे आणि दुसरीकडे दहशतवाद्यांना फडिंग करणाऱ्यांना पाठिंबा द्यायचा हे काही योग्य नाही. गुन्हेगारांची जमीन खरेदी केली म्हणून नवाब मलिक आरोपी होत नाहीत, असा जावई शोध महाविकास आघाडीने लावला आहे, असा हल्ला चढवतानाच एसटी कर्मचारी आणि डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. मात्र दाऊदशी संबंधित लोकांना वाचवण्यासाठी वेळ दिला जातोय, अशी टीकाही त्यांनी केली.
संबंधित बातम्या:
VIDEO: तपास यंत्रणा फक्त केंद्रातच नाही, महाराष्ट्रातही आहेत; संजय राऊतांचा सूचक इशारा
Latur : शेतकऱ्यांचा हाबाडा अन् पीकविम्याबाबत आश्वासन नव्हे थेट तोडगाच, लातूरात नेमके झाले काय?
Maharashtra News Live Update : नवाब मलिक हटाव देश बचाव, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल