पांडुरंगाच्या दारात सांगतो… छगन भुजबळ यांचा येवल्यात पराभव करणार; संजय राऊत गरजले
या सर्व घटनात्मक संस्था मोदी, शाह यांच्या गुलाम झाल्या आहेत. आता विश्वास फक्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर आहे. न्याय व्यवस्था, घटनात्मक व्यवस्थेचा बाजार उठवला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून कुणाला न्याय मिळणार नाही.
पंढरपूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ यांनीही राष्ट्रवादीत बंड केलं आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असतानाही भुजबळ यांनी पवारांची साथ सोडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली जाहीर सभा नाशिकमध्ये होणार आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातच पवार यांची सभा होणार आहे. त्यामुळे फुटीर आमदारांमध्ये भुजबळ पवारांच्या टार्गेटवर सर्वात वरचे असल्याचं सांगितलं जात आहे. या घडामोडी सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट भुजबळ यांनाच आव्हान दिलं आहे.
संजय राऊत पंढरपूरच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. येवल्यात आम्ही छगन भुजबळांचा पराभव करणार. मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव घडवून दाखवला आहे. नाशिकला लोकसभेत त्यांचा पराभव केला आहे. आता येवल्यात करू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
शरद पवार योद्धे
शरद पवार यांनी केलेल्या राजकारणामुळे अजित पवार इथपर्यंत पोहोचले. त्यामुळेच अजितदादांची राजकीय ताकद वाढली. अजित पवार यांच्या बंडामुळे शरद पवारांच्या राष्ट्रीय राजकारणाला ब्रेक लागला नाही. मी शरद पवारांना अजित पवारांपेक्षा जास्त ओळखतो. काही योद्धे असतात, त्यांनी कधी राजकीय संकटाची पर्वा केली नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे ही योद्धे मंडळी आहेत. हे लोकं माघार घेणार नाहीत. ते लढत राहतात. त्यांचं ध्येय प्राप्त करत असतात, असं संजय राऊत म्हणाले.
माझ्यामुळे अजितदादा गेले का?
अजित पवार माझ्यामुळे सोडून गेले का? आमच्यामुळे गेले का? बरं मी जातो बाजूला येता का 40 जण? मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी पदासाठी आयुष्य पक्षाला दिलं नाही. पण एक सांगतो लोकभावना आहे यांना दारात उभं करू नका. कशासाठी गेले? का गेले? सर्वांना माहीत आहे. एकनाथ शिंदे यांना पक्षाने काय दिलं नव्हतं. एक साधा नगरसेवक ते दुसऱ्या क्रमांकाचं मंत्रीपद त्यांना मिळालं. उद्धव ठाकरेंच्या नंतरचं पद होतं त्यांच्याकडे. अजून काय पाहिजे राजकारणात. इथे आमच्याकडे तालुकाप्रमुख, शाखाप्रमुख एसईओ होता येत नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो. तुम्हाला 15-15, 20-20 वर्ष आमदारक्या, खासदारक्या, मंत्रीपदे दिली. तरीही तुम्हाला असं वाटतं? असा सवाल त्यांनी केला.
50 कोटीला विकले गेले
मी स्वाभिमानी आणि प्रामाणिक कार्यकर्ता . मी पक्षासाठी तुरुंगात गेलो. मलाही पक्ष सोडता आला असता, गुडघे टेकता आले असते. पण पक्षाने आम्हाला मान सन्मान दिला. त्या पक्षाशी बेईमानी करणं आमच्या रक्तात नाही. माझ्यामुळे पक्ष सोडला हे त्यांनी एक उदाहरण दाखवावं. 50 कोटी रुपयाला हे लोक विकले गेले आहेत, असा दावाच त्यांनी केला.
त्यांचं हृदय जळतंय
मी मंदिरात गेलो नाही. आता जाईल. साकडं काय घालणार? महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेच्या मनात जे तेच साकडं घालणार. आम्ही काय सामान्य माणसापेक्षा वेगळे नाही. मी देवाकडे इतकच मागेल, या महाराष्ट्राची ओळख संताची भूमी म्हणून होती. ती गद्दाराची भूमी ही ओळख झाली आहे. गद्दाराची भूमी ही ओळख पुसण्याची पांडुरंगाने सर्वांना सुबुद्धी द्यावी. आमच्यासारखे महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्यांचं हृदय जळतंय. महाराष्ट्रात जे घडतंय, देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. तो महाराष्ट्र आज गद्दार, बेईमान, खोके या नावाने ओळखला जात आहे. ही अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. हीच महाराष्ट्राची भावना आहे, असंही ते म्हणाले.