नाना पटोलेंचा स्वबळाचा नारा; अशोक चव्हाण म्हणतात, मला काहीच माहीत नाही!
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज संधी मिळेल तेव्हा काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर करत आहेत. पटोलेंच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्षेपही घेतला आहे. (ashok chavan)
नांदेड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज संधी मिळेल तेव्हा काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर करत आहेत. पटोलेंच्या या भूमिकेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीने आक्षेपही घेतला आहे. स्वबळाच्या मुद्द्यावरून आघाडीकडून काँग्रेसला चिमटेही काढले जात आहेत. मात्र, असं असतानाही काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पटोलेंच्या या घोषणेवर थेट कानावर हातच ठेवले आहेत. पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबत आपल्याला काहीच माहीत नाही, असं आश्चर्यकारक विधान अशोक चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे स्वबळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचं अधोरेखित झालं आहे. (i don’t know what nana patole says about contesting alone, says ashok chavan)
अशोक चव्हाण आज नांदेडमध्ये होते. चव्हाण नांदेडमध्ये आल्याने पत्रकारांनी त्यांना गाठलं अन् थेट नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्याबाबतच प्रश्न केला. मात्र, त्यावरील चव्हाण यांचं अनपेक्षित उत्तर ऐकून पत्रकारही अवाक् झाले. नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिलाय याबाबत आपल्याला काही माहिती नाही, असं चव्हाण यांनी बिनदिक्तपणे सांगितलं. हा विषय आता संपला असून आमचे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावाही चव्हाण यांनी केलाय. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पटोलेंच्या कार्यशैलीवर आक्षेप?
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी आघाडी एकत्र निवडणूक लढणार असल्याचं वारंवार सांगितलं होतं. मुंबईचे काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप आणि काँग्रेसचे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा वगळता बहुतेक नेत्यांनी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्यावर भर दिला होता. पण पटोले यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवसापासूनच स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. निवडणुकांना अजून तीन वर्षे असतानाही पटोले यांनी स्वबळाची भूमिका रेटली आहे. पटोलेंचा हा निर्णय न पटल्याने त्यांच्या या भूमिकेवर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तर स्वबळाचा मुद्दा पटोले यांनी अधिकच लावून धरला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलेंचे कानही टोचले आहेत. आता तर चव्हाण यांनी पटोलेंच्या या निर्णयाची माहितीच नसल्याचं सांगून पटोलेंच्या निर्णयाला नाकारले आहे. तसेच अप्रत्यक्षपणे पटोलेंच्या कार्यशैलीवरही आक्षेप घेतला आहे. पटोले आपल्या निर्णयामागे संपूर्ण पक्षाला ओढून नेत असल्याची भावना निर्माण झाल्यानेच चव्हाण यांनी असं विधान केलं असावं, असं सूत्रांनी सांगितलं.
पटोले काय म्हणाले?
पटोले यांनी आजही मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप करतानाच काँग्रेसची भूमिकाही स्पष्ट केली. स्वबळावर लढायचं की नाही ही आमच्या पक्षाची स्ट्रॅटेजी राहील. आमची लाईन तयार आहे. आम्ही अनेक वेळा ठेच खाल्ली आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण तयारीनिशी उभे राहणार आहोत. 2014 मध्ये आमच्यासोबत विश्वासघात झाला. तसा विश्वासघात पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी राहणार आहोत. जो काही निर्णय घ्यायचा तो पार्टी स्टॅटेजीच्या आधारे घेऊ, असं पटोले म्हणाले. (i don’t know what nana patole says about contesting alone, says ashok chavan)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 14 July 2021 https://t.co/L6TKxdAtI4 #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 14, 2021
संबंधित बातम्या:
VIDEO: फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट
VIDEO: तुम्ही खरच एकटं लढणार आहात का?…तसं स्पष्ट सांगा; पवारांची काँग्रेस नेत्यांना विचारणा
(i don’t know what nana patole says about contesting alone, says ashok chavan)