Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदार अस्थिर करण्यासाठी बातम्या पेरल्या जाताहेत; जयंत पाटलांचा आरोप
Rajya Sabha Election 2022: अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बातम्या पेरल्या आहेत. पण कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. त्यामुळे अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो.
मुंबई: राज्यसभेसाठी मतदान (Rajyasabha Election) सुरू होताच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे (anil bonde) यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने (ncp) ऐनवेळी आपल्या मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 42 वरून 44 करण्यात आल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आघाडीत बिघाडी झाल्याच्या त्यानंतर बातम्या पसरल्या आहेत. मात्र, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. भाजपकडून अफवा पसरवल्या जात असल्याचा दावा आघाडीकडून करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मीडियाशी संवाद साधून अफवांवर भाष्य केलं आहे. अपक्ष आमदार संभ्रमित व्हावेत, अस्थिर व्हावेत म्हणून बातम्या पेरल्या जात आहेत, असं जयंत पाटली यांनी म्हटलं आहे. तसेच आमचा कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. अफवांवर जाऊ नका, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत हा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बातम्या पेरल्या आहेत. पण कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. त्यामुळे अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो. पण आमची बेरीज पाहिली तर आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असं सांगतानाच दावा नेहमीच भाजप करत आलंय संध्याकाळी निर्णय लागेल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
एमआयएमवर संध्याकाळी बोलणार
आघाडीकडून एकत्रित मतदान केलं जात नाही, त्यावरही त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी आघाडीची स्ट्रॅटेजी सांगितली. आघाडी एकत्रित आहे. टप्याटप्याने मतदान कसं करायचं ही आमची स्ट्रॅटेजी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच एमआयएमवर मी संध्याकाळी बोलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मलिक, देशमुखांवर अन्याय
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचा मतदानासाठीचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदानापासून मुकावं लागणार आहे. त्यावरही पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. मतदान करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे, असं सांगतानाच उच्च न्यायालयाकडून या दोन्ही नेत्यांना दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.