Photo Story: ‘गोयंची नवी सकाळ’, गोव्यात ममतादीदींचे पोस्टर झळकले; माजी मुख्यमंत्रीही तृणमूलच्या गळाला
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारलं आहे. ममता बॅनर्जींनी निवडणुकीची घोषणा करताच गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहे. (Mamata's party Trinamool Congress will also contest assembly elections in Goa)

पणजी: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोवा विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गोव्यात तृणमूल काँग्रेसमध्ये चैतन्य संचारलं आहे. ममता बॅनर्जींनी निवडणुकीची घोषणा करताच गोव्यात ममता दीदींचे पोस्टर झळकले आहे. पणजी विमानतळाच्या परिसरात हे पोस्टर झळकले असून त्यावर गोयंची नवी सकाळ असं लिहिलं आहे. तसेच विमानतळाजवळ तृणमूल कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं आहे.

Mamata Banerjee
ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस गोव्याच्या निवडणूक मैदानात उतरणार असल्याचं जाहीर करताच गोव्यात ममता बॅनर्जी यांचे पोस्टर झळकले आहेत. ममतादीदींचा फोटो आणि गोयंची नवी सकाळ असं हेडिंग लिहिलेली ही पोस्टर झळकली आहेत. त्याशिवाय पणजी विमानतळासह गोव्यात अनेक ठिकाणी रोडवर टीएमसीचे झेंडेही झळकवून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या या पोस्टरबाजीमुळे गोव्यात राजकीय चर्चांना चांगलच उधाण आलं आहे.

Mamata Banerjee
माजी मुख्यमंत्री फलेरो तृणमूलमध्ये
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुइजिन्हो फलेरो यांनी आज तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने तृणमूलला मोठं बळ मिळालं आहे. फलेरो यांनी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे भेट घेऊन त्यांच्या उपस्थित तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे फलेरो हे गोव्यातील तृणमूलचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि चेहरा असणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोव्यात 2022 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यापार्श्वभूमीवर टीएमसीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Mamata Banerjee
ममतादीदीच टक्कर देऊ शकतात
गोव्यातून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या पक्षाची नितांत गरज आहे. ती कमतरता आम्ही पूर्ण करणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणाऱ्या नेत्याची देशाला गरज आहे. ममता बॅनर्जीच या केवळ मोदींना टक्कर देऊ शकतात हे पश्चिम बंगालच्या निकालातून स्पष्ट झालं आहे, असं टीएमसीचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितलं.

Mamata Banerjee
चार वर्षात काय घडलं?
2017मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. गोव्यात सर्वाधिक 17 जागा मिळवून काँग्रेस नंबर वनचा पक्ष ठरला होता. तर भाजपला 13 जागा जिंकता आल्या होत्या. मात्र, सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात काँग्रेस हायकमांडने चार दिवस घालवले. त्याकाळात भाजपने अपक्षांना गळाला लावून राज्यात सत्ता स्थापन केली होती. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीसह अपक्षांनी भाजपला साथ दिली होती. त्यानंतर गेल्या चार वर्षात एक एक करून काँग्रेसचे 11 आमदार भाजपमध्ये सहभागी झाले होते. तर महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचेही प्रत्येकी दोन आमदार भाजपमध्ये सामिल झाले होते. त्यानंतर भाजपने विधानसभेत स्वत:चं बहुमत सिद्ध करून महाराष्ट्र गोमंतक पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीला सत्तेतून बाहेर ठेवलं होतं. या दोन्ही पक्षाला फोडल्यानंतर भाजपने त्यांच्याशी युती तोडली होती.
संबंधित बातम्या:
उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले
पंजाबमध्ये राजकीय भूकंप! नवज्योत सिंह सिद्धूसह काँग्रेसच्या 5 नेत्यांचा राजीनामा
(Mamata’s party Trinamool Congress will also contest assembly elections in Goa)