शरद पवार यांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊत यांचं पहिल्यांदाच भाष्य; जाहीरपणे म्हणाले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येणार आहेत. शरद पवार हे त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा.
मुंबई | 31 जुलै 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या पुण्यात एकाच मंचावर येणार आहेत. एकीकडे विरोधकांनी इंडिया आघाडीची स्थापना करून एनडीएसमोर आव्हान उभं केलेलं असतानाच शरद पवार हे उद्या मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार असल्याने महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. शरद पवार यांची ही भूमिका महाविकास आघाडीतील नेत्यांना पटली नसल्याचं दिसून येत आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर शरद पवार यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे विधान करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
खासदार संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही नाराजी व्यक्त केली. जनतेच्या मनात संभ्रम करणाऱ्या भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊ नये, असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून हे विधान केलं असलं तरी त्यांच्या विधानाचा संपूर्ण रोख हा शरद पवार यांच्या दिशेनेच आहे. कारण उद्या पुण्यात एक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार जाणार आहेत. या कार्यक्रमात मोदीही असणार आहेत, म्हणून संभ्रम निर्माण होणार असल्याचं राऊत यांना म्हणायचं असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दोन कारणांमुळे संभ्रम
शरद पवार यांच्याबाबत दोन कारणांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्याच हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि इंडिया आघाडीची पुढच्या महिन्यात मुंबईत होऊ घातलेली बैठक या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मोदींच्या कार्यक्रमात जाणं ठाकरे गटाला रूचलेलं नसल्याचं सांगण्यात येतं. उद्याच्या कार्यक्रमात सर्व महायुतीचे नेते असणार आहेत. तिथे शरद पवार गेले तर अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचं बळ असल्याची चर्चा होऊ शकते, त्यामुळेही ठाकरे गटाची नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.
दुसरं कारण म्हणजे उद्या राज्यसभेत दिल्ली सेवा बिल येणार आहे. जर शरद पवार पुण्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यास ते या बिलावर चर्चा होणार आहे. शिवाय या बिलावर उद्या मतदान होण्याचीही शक्यता आहे. अशावेळी शरद पवार यांच्या सारखे सीनिअर नेते उपस्थित राहिले नाही तर त्याचे चुकीचे राजकीय अर्थ निघू शकतात. पवार यांनी भाजपला अप्रत्यक्ष मदत केल्याचा त्याचा अर्थ निघू शकतो. त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
पवारांनी जाऊ नये
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींसोबत एकाच मंचावर उपस्थित राहू नये. शरद पवार जर उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर देशात वेगळा संदेश जाईल, असं कुमार सप्तर्षी यांनी शरद पवार यांना भेटून सांगितलं. दरम्यान, शरद पवार हे उद्याच्या कार्यक्रमाला जाण्यावर ठाम असल्याचं सांगण्यात आलं.
पवारांनी एकदा विचार करावा
काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्याला येणार आहेत. शरद पवार हे त्या कार्यक्रमाला जाणार आहेत. पण महाविकास आघाडी म्हणून आमची त्यांना विनंती आहे की, त्यांनी जाण्यापूर्वी एकदा विचार करावा. कारण महाविकास आघाडीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर घटनेबद्दल आपण सर्वसामान्यांमध्ये जातोय, त्यांचा निषेध करतोय आणि अशी व्यक्ती जी मणिपूरला गेलीच नाहीये त्यांच्यासोबत स्टेज शेअर करणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळे शरद पवार यांना काँग्रेस तर्फे आवाहन आहे की त्यांनी एकदा तरी याचा विचार करावा, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.