Sanjay Raut : छत्रपतींच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनाही महाराष्ट्राने माफ केलं नाही; राऊतांचा विरोधकांना टोला
Sanjay Raut : गळलेल्या पानातून नवी पालवी फुटत नाही. जे झाड असतं त्याला पालवी फुटते. त्यांनी जीवशास्त्राचा थोडा अभ्यास केला पाहिजे. भुगोलाचा, भौतिकशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रात महाप्रलय आहे. त्यात अनेक ओंडकेही वाहून गेले आहेत.
मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? उद्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही फोटो वापरण्यास मनाई केली तर कसं होईल?, असा सवाल शिंदे गटाच्या बंडखोरांनी शिवसेनेला (shivsena) केला होता. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपतींच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्राने कधी माफ केलं नाही. छत्रपतींबाबतही विश्वासघाताचं राजकारण झालं. त्याची आठवण महाराष्ट्राने अजून ठेवली आहे. हे त्यांनी लक्षात ठेवावं. विश्वासघाताने अनेकांनी फौजा निर्माण केल्या. म्हणून त्यांना छत्रपतींचं नाव किंवा फोटो वापरण्याची परवानगी नव्हती. ते सर्व लोकं मोगलांचे मांडलिक म्हणून काम करत होते. महाराष्ट्रातही तोच प्रयोग सुरू आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी आजच्या मुलाखतीत काही भाष्य केलं असेल तर जरा सब्र करो. थांबा जरा, उद्या दुसरा भाग यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राने ती मुलाखत पाहिली आहे. देशभरात ती मुलाखत पाहिली गेली आहे. त्यामुळे काही मोजके लोकं आपली मते व्यक्त करत असेल तर लोकशाहीने त्यांना तो अधिकार दिला आहे. आम्ही काही लोकशाहीचे मारेकरी नाहीत. शिंदे गटाचे काही लोकं काही भूमिका घेऊन उभे राहिले असतील. आम्ही त्यावर काहीच मते व्यक्त करत नाही. तुम्ही ज्या शिवसेनेचा विश्वासघात केला. त्या पक्षाचे पक्षप्रमुख बोलत आहेत. तरीही तुम्ही त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करत असाल तर तुम्ही कसले शिवसैनिक?, असा सवालच राऊत यांनी केला.
बाळासाहेबांचे चरणच ओढले
आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या चरणावर लीन होत असतो, असं शिंदे गटाचे आमदार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी टीका केली. बाळासाहेबांचे चरणच तुम्ही ओढले आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला.
गळलेल्या पानातून पालवी फुटत नाही
गळलेल्या पानातून नवी पालवी फुटत नाही. जे झाड असतं त्याला पालवी फुटते. त्यांनी जीवशास्त्राचा थोडा अभ्यास केला पाहिजे. भुगोलाचा, भौतिकशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रात महाप्रलय आहे. त्यात अनेक ओंडकेही वाहून गेले आहेत. त्यामुळे त्यांचं लक्ष ओंडक्यांकडे आहेत. आमचं लक्ष जी झाडं महापुरात सुद्धा रुजून आहेत. त्यापैकी आम्ही आहोत, असं ते म्हणाले.
एखाद दुसऱ्या निर्णयाची समीक्षा होऊ शकते
आदित्य ठाकरेंनी जे निर्णय घेतले ते राज्याच्या हिताचे होते. आता ते कोणी रोखत असेल तर महाराष्ट्रासोबत अन्याय होत आहे. एखाद दुसऱ्या निर्णयाची समीक्षा होऊ शकते. सरकार बदलल्यावर असं होतं. पण आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच राज्यात पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालय आहे हे दाखवून दिलं. ते काम करू शकते हे दाखवून दिलं आहे. आरेचं जंगल वाचवलं त्याची समीक्षा करत आहात का? दोन हजार झाडे कापली होती. आदित्य ठाकरेंनी ते वाचवलं आहे. मोदीच सांगतात जंगल वाचवा, झाडे वाचवा तेच आदित्य यांनी केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.