Shanishchari Amavasya 2022: या 5 राशींवर शनि भारी! शनी अमावस्येच्या दिवशी ‘हे’ काम केल्यास होईल समस्येचं निवारण
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी दानधर्म, पितरांचे तर्पण आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या वर्षी भाद्रपद अमावस्या शनिवार, 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी शनिवार असल्याने शनिश्चरी अमावस्या म्हटले जात आहे.
भाद्रपद महिन्यातील (Bhadrapad Amavasya) कृष्ण पक्षातील अमावस्येच्या तिथीला भाद्रपद अमावस्या अथवा भादौ अमावस्या म्हटले जाते. पितृ पक्षाच्या आधी येणाऱ्या या अमावस्येचे विशेष महत्व सांगितले आहे. या दिवशी दानधर्माचे कार्य, पितरांना तर्पण आणि पिंडदान (Pind Daan) केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. या वर्षी भाद्रपद अमावस्या शनिवार, 27 ऑगस्ट रोजी आहे. या दिवशी शनिवार असल्याने शनिश्चरी अमावस्या (Shanishchari Amavasya) म्हटले जाते. या वर्षी भाद्रपद महिन्यातील अमावस्येची तिथी शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 24 मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी, 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 47 मिनिटांनी अमावस्या संपेल. ज्योतिषांच्या सांगण्यानुसार, अमावस्या आणि शनिवार असा दुर्लभ योग फार कमी वेळा येतो. भाद्रपद महिन्यातील शनिश्चरी अमावस्येचा योग 14 वर्षांनी येत आहे. यापूर्वी असा योग 30 ऑगस्ट 2008 साली आला होता.
5 राशींवर साडेसाती –
ग्रहांचे सेनापती असणारे शनीदेव सध्या मकर राशीत वक्र अवस्थेत विराजमान आहेत. धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर सध्या साडेसाती सुरू आहे. तर मिथुन आणि तूळ राशीचे लोकही शनीच्या वक्रदृष्टीमुळे त्रस्त आहेत. ज्योतिषांच्या सांगण्यानुसार, शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी ढैय्या आणि साडेसातीमुळे पीडित असलेल्या राशीच्या लोकांनी काही विशेष उपाय केल्यास आराम मिळू शकतो.
शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय –
1) जे लोकं शनीच्या साडेसाती आणि वक्रदृष्टीमुळे त्रासले आहेत, त्या लोकांनी या शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी शनीदेवांना मोहरीचे तेल अर्पण करावे. शनीदेवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनीसमोर काळ्या उडदाच्या डाळीचा नैवेद्य दाखवून त्याचा प्रसाद इतर लोकांमध्ये वाटावा.
2) शनिश्चरी अमावस्येच्या एक दिवस आधी थोडा गूळ आणि काळी उडीद डाळ एका कापडात बांधून ठेवावी. ते कापड रात्री झोपताना उशाशी ठेवावे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी नीकापडात बांधलेल्या या गोष्टी शनी मंदिरात दान कराव्यात. यामुळे शनीची साडेसाती आणि वक्रदृष्टीचा नकारात्मक प्रभाव कमी होईल.
3) साडेसाती आणि वक्रदृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी छाया (सावली) दान करावी. त्यासाठी एखाद्या भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे आणि त्यामध्ये नाणे टाकावे. नंतर त्या भांड्यात आपली सावली अथवा प्रतिमा पहावी आणि एखाद्या गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करावे. त्यानंतर पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि शनीदेवाकडे आपल्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी प्रार्थना करावी.
( टीप- लेखात देण्यात आलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. यातील तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)