परभणीत आजपासून कबड्डीचा दम घुमणार, महाराष्ट्रातील नवीन टॅलेंट येणार समोर
किशोर गटात आज यजमान परभणी विरुद्ध नांदेड, गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांचे सामने होणार आहेत, तर किशोरी गटात गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर असे सामने होतील.
मुंबई: परभणीत आजपासून भव्य कबड्डी स्पर्धेला (Parbhani Kabaddi competition) सुरुवात होणार आहे. राज्यभरातून किशोर गटातील मुला-मुलींचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून कबड्डीमधील नवीन टॅलेंट दिसणार आहे. 32 व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या अधिपत्याखाली परभणी जिल्हा कबड्डी असोशिएशन साई क्रीडा मंडळ-खेडूला यांच्या सहकार्याने 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होईल.
किशोर गटात आज यजमान परभणी विरुद्ध नांदेड, गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांचे सामने होणार आहेत, तर किशोरी गटात गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर असे सामने होतील. या स्पर्धेत 25 जिल्ह्यांचे मुलांचे तर २२ जिल्ह्यातील मुलींचे संघ सहभागी होणार आहेत.
अखेरच्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये ठाण्याने विजेतेपद तर पुण्याने उपविजेतेपद मिळवले होते. मुलींच्या गटात मुंबई उपनगर विजेते तर यजमान परभणीला उपविजेतेपद मिळाले होते.